PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024   

PostImage

डॉक्टरांसह कर्मचारीही मारतात दांडी..


 मालेगाव/वाशीम, (ता.प्र). तालुक्यातील आदिवासीबहुल भागात नव्यानेच सुरू झालेल्या मुसळवाडी आरोग्यवर्धिनी केंद्रातून दुपारी 3 वाजताच सर्व कर्तव्यावरील डॉक्टर व कर्मचारी आरोग्यवर्धिनीला कुलूप ठोकून दांडी मारत असल्याचे दिसून आले. उपस्थित ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर आरोग्यवर्धिनी केंद्रावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी आरोग्यवर्धिनीमध्ये येण्या-जाण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसून सकाळी 9.30 वाजेपासून एक-एक कर्मचाऱ्यांचे आगमन सुरू होते. 10 वाजतानंतर आरोग्यवर्धिनी केंद्रात ओ.पी.डी. चालू होत असून 2 वाजताओ.पी.डी. बंद करण्यात येते.

 

आरोग्यवर्धीनी केंद्र सुरू झाल्यापासून संध्याकाळी 4 वाजता एकदाही ओपीडी घेण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे. दुपारची ओ.पी.डी. घेण्यात येत नसल्यामुळे डॉक्टर व कर्मचारी सकाळीओ.पी.डी. करून आरोग्यवर्धिनी केंद्रातून दांडी मारत असल्याचे दिसून येत आहे. 

 

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता आता दोन्ही वेळेस ओ.पी.डी. चालू असून कर्मचारी केंद्रात उपस्थित असल्याचा बनाव करीत आहेत.

 

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. या भागातून मोठ्या  प्रमाणात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी किन्हीराजा, मालेगाव, जऊळका, येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचार घेण्यासाठी महिलांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुसळवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात सकाळ व संध्याकाळच्या दोन्ही ओ.पी.डी. सुरू करून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ केंद्रात उपस्थित राहण्याची सक्ती करण्याची मागणी रुग्णांसह ग्रामस्थांकडून होत आहे.